आंबेडकर वादाचे महत्व
जनतेच शोषण हे वर्गीय आधारावर होत अस मार्क्सवादी दृष्टीकोन सांगतो. म्हणजे उत्पादन साधने कोणती, ती कोणाच्या मालकीची, कोणावर कोण अवलंबून, कसे अवलंबून, हितसंबध कसे? देवाणघेवाण कोणा कोणाची, कशी, यावर शोषणाचे प्रकार व प्रमाण अवलंबून असते. असे त्यांच्या तत्वाद्नानाचे स्वरूप आहे. हे स्वरूप वैज्ञानिक आधारावर टिकणारे असल्याने आम्हाला ते मान्यच आहे.
मार्क्स म्हणतो 'जगातील कामगारानो एक व्हा!'. तो असे सांगतो कारण,भांडवलदार हे कामगारांचे शोषण करत असतात. कारखाना हा त्यांच्या मालकीचा असतो. कामगारांना कमी पगार देवून, जास्त काम करून घेवून शिल्लक राहिलेला वरकड (नफा) मालक स्वत: साठी घेत असतो. यामुळेच कामगारांच शोषण होत असत. जर कारखानाच कामगारांच्या सामुहिक मालकीचा असेल तर अशा प्रकारचे शोषण होणार नाही. या पायावर मार्क्स म्हणतो 'शोषणाचे मुल हे खाजगी मालमत्ते मध्ये आहे.' त्यासाठी तो जगातील कामगारांना एक होण्यास सांगतो. कामगार वर्गाचे नेतृत्व आणि शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व अन्य वर्ग यांची भक्कम एकजूट झाल्यावर मध्यम वर्गाला सोबत घेवून भांडवलदार (शोषक) वर्गाला हाकलून सत्ता ताब्यात घेणे आणि सर्व साधन संपत्तीचे राष्ट्रीयीकरण आणि समान वाटप या आधारे खासगी मालमत्ता नष्ट करून शोषणाचा अंत करणे,असे तो करू इच्छितो. त्यांच्या या विचाराचे आणि तत्वज्ञानाचे आम्ही स्वागत करतो. कारण ते संपूर्णपणे विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारे आहे.
असे असतानाच मार्क्स आणखी एक वाक्य वापरतो आणि ते म्हणजे ' विचार जेव्हा समाज मनाची पकड घेतात तेव्हा ते भौतिक शक्ती बनतात.' सध्या भारतीय समाजावर हिंदी धर्माच्या विषमतावादी आणि मानसिक गुलाम बनविणाऱ्या विचारांची पकड असल्याने त्याच विचारांची भौतिक शक्ती बनलेली आपणास दिसते. म्हणूनच बाबरी मशीद पडायला महाराष्ट्रातून हजारो तरुण जातात. तर गुजरात मध्ये मुस्लिमांच्या कत्तली करायला दलित आदिवासी जातात. मुंबई वरचा लाल बावटा हटतो आणि शिवसेनेचे राज्य येते. यासाठी स्वातंत्र्य समता बंधुतेचा अभाव असणारा आणि गुलामी, विषमता आणि शत्रुत्वाने ठासून भरलेल्या हिंदू (ब्राह्मणी) धर्माचा जेव्हा भारतीय जनता त्याग करेल आणि स्वातंत्र्य समता बंधुतेचा विज्ञानवादी, भौतिक वाडी बुद्ध धम्म जेव्हा ती स्वीकारेल तेव्हाच त्या विचारांची भौतिक शक्ती बनेल.याच अर्थाने डॉ.आंबेडकरांचे एक वाक्य आहे ते असे ' कोणतीही राजकीय क्रांती घडण्यापूर्वी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडावी लागते.' आणि त्यासाठीच भारतीय जनतेच बौद्ध धर्मांतराचे अत्यंत महत्वाचे पाऊल टाकून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा पाया रचला. किंवा समतेचे विचारांची भौतिक शक्ती निर्माण होवून राजकीय क्रांती यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग सांगितला. त्यासाठी आम्ही त्यामार्गाने जाणार आहोत.
तसेच शोषण हे केवळ वर्गीय आधारावर अवलंबून नसून शोषणाचा आणखी एक प्रकार आहे आणि तो म्हणजे समाजात जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश आणि रंग या आधारे भेद असतात. व या भेदांच्या आधारावरील विषमता असते. व विषमतेमध्ये शोषण असते. मार्क्स वाद्यांचे शोषणाच्या या दुसर्या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. किंवा जाणूनबुजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे असे वाटते कारण एकदा शोषणाचे मुल खाजगी मालमत्तेमध्ये आहे असे मानले कि फक्त खासगी मालमत्ता नष्ट करण्याचा आटापिटा सुरु होतो आणि जगातील सर्व साधन संपत्तीचे सामुहीकरण, सार्वजनिकीकरण किवा राष्ट्रीयीकरण झाले आणि समान वाटप झाले कि प्रश्न मिटला असे त्यास वाटत असावा. प्रश्न इतका काही सोपा नाही. कसा तर, 'जगातील कामगार एक होतील का?' असा प्रश्न त्यासाठी विचारावा लागतो. तो विचारल्यावर आम्ही म्हणतो समाजामध्ये वरील प्रकारचे भेद, त्या आधारा वरील विषमता व शोषण जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत जगातील कामगार एक होणार नाहीत. आणि जरी झाले तरी त्यांची एकी कायमस्वरूपी टिकू शकणार नाही. कारण शोषक वर्गाला किवा ज्यांना विषम व्यवस्था हवी आहे त्यांना बेकीचे स्वरूप देणे सहज शक्य आहे. आमच्या या विधानाच्या पुष्ट्यर्थ अनेक ऐतिहासिक पुरावे आमच्या कडे आहेत. उदाहरणच जर द्यायचे झाले तर १. भारत पाकिस्तान फाळणी २. रशियाचे हस्तांतरण, कम्युनिष्टांच्या ताब्यातील मुंबईत शिवसेना कामगारांमध्ये पुढील प्रकारे फुट पाडण्यात केवळ यशस्वीच ठरली नाही तर त्यांनी त्यामध्ये दंगली देखील घडविल्या. अ) हिंदू मुस्लीम ब) दलित सवर्ण क) मराठी अमराठी इ.
छोट्या समूहाचे मोठ्या समूहांमध्ये सामिलीनीकरण, विलीनीकरण, एकत्रीकरण, या प्रक्रिया फार प्राचीन काळापासून सुरु आहेत. त्यानुसार मानवी संस्कृती मध्ये सुधारणा किंवा बदल होत आलेले आहेत आणि अजूनही ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच वरील प्रकारचे भेद समाजात अजूनही शिल्लक आहेत. भारतामध्ये तर ती प्रक्रिया अजून प्राथमिक टप्पा हि गाठू शकलेली नाही. कसे ते पुढे दिलेले आहे.
आदिम अवस्थेत माणूस हा टोळ्यांमध्ये रहात असे त्याच्या टोळीतील सभासदत्वहे रक्तसम्बधावर आधारलेले असे. नात्याच्या बाहेरील व्यक्तीस टोळीत प्रवेश नसे. मात्र माणसाला ज्यावेळी शेतीचा शोध लागला तेव्हा हा भटका मानव स्थिर झाला. एक टोळी दुसऱ्या तोलीशेजारी राहू लागणे नेहमीचे झाले. चार पाच पिढ्या नंतरही ज्या लोकांना बघतोय,त्यांच्याशी व्यवहार करतोय त्या लोकांना आपल्याच टोळीतील मानले जाऊ लागले. शिवाय आपसात आंतरजातीय विवाह घडून आल्यानंतर दोन जमातींची आपसात विलीनीकरण, सामीलीकरण, एकत्रीकरण या प्रक्रिया जलद घडून आल्या. पाश्चिमात्य देशात हे सर्व घडून आले मात्र भारतात तसे घडले नाही याचे कारण ब्राह्मणी धर्म. ब्राह्मणी धर्माने स्थायी जमातींना वर्णाच्या आधारे व वर्गाच्या आधारे बंदिस्थ केले व जमातींच्याच पुढे जाती बनल्या. असे कसे घडून आले तर पुढीलप्रमाणे.
चातुर्वर्ण्याच्या आधारे जाती चार वर्णात आणि चांडाळ नावाच्या अवर्नात विभागल्या गेल्या. वर्णाच्या आधारे उच्चनीचता, त्या आधारे निचवर्नियाचा द्वेष तिरस्कार घडून आले. निचवर्नाच्या क्रमांकानुसार त्यांचे हक्क व अधिकार नाकारणे, अस्पृश्यता असे प्रकार घडले. एवढे करूनही ब्राह्मणी धर्म थांबला नाही. तर प्रत्येक जातीला नेमून दिलेलाच व्यवसाय करायचा. अन्य कोणताही व्यवसाय करण्यावर बंदी. यामुळे जाती या वर्गीय दृष्ट्या देखील बंदिस्थ झाल्या. प्रत्येक जातीचा स्वतंत्र वर्ण व स्वतंत्र वर्ग. आणि त्याआधारे त्याची जात बंदिस्थ आणि माणूस जातीत बंदिस्थ. असा प्रकार. तशातच आणखी आंतरजातीय व आंतरवर्नीय विवाह बंदी, पुरुष प्रधानता इ. मुले भारतीय शोषण तीव्रतर बनले, बनत गेले.
जातीचे कायदे आणि ब्राह्मणी धर्मामुळे त्याचे सर्व कायदे यामुळे भारतीय माणूस हा एका बंदिवासातच हजारो वर्षे राहत आलेला आहे. तशातच प्रत्येकाचा बंदिवास सारखा नाही. कुणाचा कमी जास्त सुखकर तर कुणाचा कमीजास्त दुख:कारक तर कुणाचा अत्यंत दुख:कारक, तो हि कमी जास्त प्रमाणातच.
माणूस या बंदिवासात का राहिला? कारण माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्याची जात हाच त्याचा समूह आहे. आणि त्याच्या जातीला म्हणजेच त्याच्या समुहालाच बंदिस्थ बनविले गेले आहे. बंदीतून सुटका केवळ जंगलात जावून राहण्यानेच होणार आहे. आणि जंगलात राहणे हे असुरक्षित आहे. व त्यासाठी समूहाच्या बाहेर जावे लागणार आहे.
आजही माणूस या बंदीतून मुक्त नाही. आणि त्याच्यात एकी नाही. त्याच्यात बेकी निर्माण करण्याचे व बेकी टिकवण्याचे काम ब्राह्मणी (हिंदू) धर्माची वर्णव्यवस्था आणि वर्गबंदी, आंतरजातीय विवाह बंदी व पुरुष प्रधानता इमाने इतबारे करत आहे.
ब्राह्मणी धर्माचे नामशेषीकरण , जात हि वर्णातून व वर्गातून मुक्त करणे, जातींचे आपसात विलीनीकरण, प्रत्येक व्यक्तीला, जातीला समान हक्क व समान संधी, स्त्रीपुरुष समानता आणि पुरेशी सुरक्षितता इ. बाबी घडून आल्याशिवाय भारतातला कामगार काही एक होणार नाही आणि झाला तरी ती एकी काही टिकणार नाही. का ते वर सांगितलेलेच आहे. त्यासाठी प्राधान्याने या स्वरूपावर आधारलेली चळवळ चालवली गेली पाहिजे.
अशातच भांडवलशाही देखील आपले अधिकाधिक रौद्र रूप धारण करत पायाशी येवून पण ठेपली आहे. आणि ती तिच्या पद्धतीने शोषण करतेच आहे. शोषण तीव्रतर बनवते आहे, इतकेच नव्हे तर ब्राह्मनशाहीशी हातमीलवणी करून शोषण अधिकाधिक धारधार बनवते आहे. यामुळे भारतीय समाजाची जखम अत्यंत चिघळू लागली आहे. दुख: घातक बनले आहे. भारताची अवस्था केविलवाणी बनलेली आहे. आणि म्हणूनच भारतीय शोषणाविरुद्धाची लढाई हि अत्यंत गुंतागुंतीची बनली आहे.
ब्राह्मणशाही विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला बुद्ध उपयोगी आहे तर भांडवलशाही विरुद्ध लढण्यास आम्हाला मार्क्स उपयोगी आहे. एकाची सोबत व एकाला नकार असला प्रकार आम्हाला मान्य नाही. महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले शेटजी भटजी आणि लाट्जी हे आमचे तीन शत्रू आहेत. डॉ. आंबेडकरांनी आम्हाला सांगितले ब्राह्मणशाही (भटजी) आणि भांडवलशाही (शेटजी व लाटजी) हे आमचे दोन शत्रू आहेत. यासाठी आम्ही ब्राह्मणशाही विरुद्ध बुद्ध धम्माचे तत्वज्ञानं वापरणार तर भांडवलशाही विरुद्ध मार्क्सचे तत्वज्ञान वापरणार. त्याची सांगड कशी घालायची? तर त्याचेही उत्तर आमच्याकडे आहे. आणि ते म्हणजी आंबेडकरवाद...
Comments
Post a Comment