जातीअंत

जातीअंत  

जात नष्ट का व्हायला हवी ?  

१. साम्यवादाच्या प्रस्थापनेसाठी -
मार्क्स म्हणतो ' जगातील कामगारांनो एक व्हा!' मात्र प्रश्न उभा राहतो, जगातील कामगार एक होतील का? भारतीय परिप्रेक्षात पहायचे झाले तर भारतात असणाऱ्या हजारो जाती, वर्णव्यवस्था, त्यामध्ये असणारी उचनिचता, स्पृश्यास्पृश्यता तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इ. बाबतीत असणारी विषमता, शोषण हे पाहता कामगारांमध्ये आपसात जातीवरून तेढ, द्वेष, उचनिचता, विषमता जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत भारतातील कामगार एकजूट होतील असे वाटत नाही. जोपर्यंत कामगार वर्ग एक होत नाही तोपर्यंत मार्क्सला अपेक्षित क्रांती यशस्वी होऊ शकणार नाही. परिणामी साम्यवादाची प्रस्थापना होणार नाही. आणि झालीच तरी ती क्रांती फार काळ टिकू शकणार नाही. यासाठी जातीअंत होणे अत्यंत आवश्यक आहे.
२. भारताचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी - 
भारताचा इतिहास पाहिल्यास प्राचिन काळापासून भारत हा परकीय सत्तेचा गुलाम राहिलेला आहे. सतत होणारी आक्रमणे आणि अपरिहार्यपणे येणारी हार व गुलामी यास आपसातील फुट, विभाजन, परस्परातील द्वेष कारणीभूत राहिलेला आहे. भारतीय लोक लढवय्ये, दणकट आणि शस्त्रसज्ज असूनही नगण्य बाबींवरुन भारतास अनेक वेळा गुलामी पत्करावी लागली. यास जात आणि वर्णव्यवस्थेवरील आधारीत समाज हे प्रमुख कारण आहे.
३. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी - 
भारतात अनेक वेळा दलित सवर्ण तसेच जाती - जातींमध्ये तेढ, द्वेष, अविश्वास निर्माण होवून त्याचे रुपांतर हिंसक दंगलींमध्ये होते किंवा बहुसंख्याकांकडून अल्पसंख्य जातीस अत्याचारास बळी पडावे लागते. यामुळे कायदा सुव्यवस्थेची मोडतोड होवून पोलिस यंत्रणेवरचाही ताण वाढतो.
४. राष्ट्रीय एकात्मतेसाठी - 
भारत देश विविधतेमध्ये एकता यासाठी ओळखला जातो. पण जातीमध्ये विविधता आढळून येण्यापेक्षा विषमता आढळून येते. आणि जातीजातींमध्ये असलेली स्पर्धा, तेढ, परस्पर अविश्वास, प्रेमाचा अभाव, एकमेकांचा द्वेष यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला सातत्यपूर्ण जिवंत स्वरुपाचा ज्वालामुखी प्रमाणे सतत आतल्या आत धुमसत राहणारा धोका आहे.

जात नष्ट करण्याचे उपाय 

१. हिंदू धर्माचा त्याग - 
जाती व्यवस्था ही हिंदू धर्माची देण असून वर्णव्यवस्था, उचनिचता, परस्परांचे व्यवसाय करण्यास बंदी, आंतरजातीय विवाह बंदी, अस्पृश्यता, पौरोहित्याचे ब्राह्मणी पेटंट इ. बाबी या केवळ हिंदू धर्माचे प्रतिक असून जातीच्या अंतासाठी जनतेने हिंदूधर्माचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.
२. जातीचा परंपरागत व्यवसायाचा त्याग -
मुख्यत: ज्या जाती जो व्यवसाय परंपरागत रित्या करत आल्या आहेत त्यानुसारच त्यांची ओळख होते. शिवाय त्यानुसारच त्यांचा सामाजीक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्शिएत्रात दर्जा ठरत असतो. न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, माळी, कुणबी, मांग, ब्राह्मण यांचे प्रत्येकाचे व्यवसाय निश्चित आहेत. त्यानुसार त्यांना मिळणारी वागणूक व आर्थिक स्थिती आधारीत आहे.
या आधारावर विचार करता व्यक्तींनी स्वजातीच्या व्यवसायाचा त्याग करून अन्य कोणतेही व्यवसाय स्विकारणे, ते शिकून घेणे आवश्यक आहे. जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी ही महत्वाची बाब आहे.
३. गावाचा त्याग -
गाव म्हणजे १२ बलुतेदार, १८ आलुतेदार, जातीनिहाय परंपरागत वस्त्या, त्यानुसार असणारे परस्पर असामंजस्य, खोट्या प्रतिष्टा व जाती आधारीत मान सन्मान व अपमान, उचनिचता, सरंजामी प्रवृत्ती, अहगंड व न्यूनगंड इ. बाबी या गावाचे वैशिष्ट्य आहे. जात आणि गाव हे परस्परांशी एकनिष्ठ व एकरूप आहे.
याउलट शहरातील वस्त्या ह्या मिश्र वसाहती असतात, उत्पन्नाच्या अनेक संधी व अनेक व्यवसाय उपलब्ध असतात, लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोणता व्यक्ती कोणत्या जातीचा आहे याची विचारपूस करून व्यवहार करण्याची गरज उरत नाही. शिक्षणाच्या संधीमुळे मागास समजुती पुसण्यास मदत होते. धनदांडग्या जातींची हुकूमशाही व प्रभाव क्षीण होवून त्यांची भाडभीड न ठेवता स्वतंत्र मनाने निर्णय घेता येतात. गावातील अल्पसंख्य जातीस, मागास जातीस शहरात संरक्षण भेटते. या बाबींचा विचार करता गाव सोडून शहराकडे स्थलांतरीत होण्यास जातीअंताच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व असून, त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शहराकडे चला हा नारा दिला होता.
४. आडनावाचा त्याग - 
बऱ्याच वेळा आडनावांवरुन व्यक्तीची जात चटकन समजते. कित्येकांचे नाव सांगूनही समाधान होत नाही. आडनाव, गाव इ. विचारुन जातीचा अंदाज लावला जातो. सदर व्यक्तीशी कसे वागायचे हे त्यानंतर ठरविण्यात येते. त्यामुळे आडनावांचा त्याग केल्यास जात कळणे व त्यानुसार होणारा भेदभाव टाळता येवू शकतो.
५. आंतरजातीय विवाह - 
आंतरजातीय विवाहांमुळे केवळ २ व्यक्तीच नव्हे तर दोन कुटूंब त्यापुढे जावून २ जाती एकत्र येतात. परस्परांमधील द्वेष, तेढ, स्पर्धा, तिरस्कार संपुष्टात येवू शकतात. प्रेमच जातीय द्वेषाला सडेतोड उत्तर आहे. शहरातील शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधीमुळे नवी आंतरजातीय प्रेमप्रकरणे तर उभी राहतात मात्र त्यास विवाहांचे स्वरूप येत नाही. यामागे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थांचा विरोध कारणीभूत असतो. घरातून हाकलून देण्यापासून खून करण्यापर्यंत स्वत:चे आईवडील व जवळचे लोक वर्तणूक करतात यास सामाजीक रूढी परंपरावादी विचारसरणी, सामाजीक दबाव इ. बाबी जबाबदार  आहेत. सुशिक्षित नवतरुणानी पोलिस, सामाजिक संस्था, संघटनांची मदत, सहकार्य व सरंक्षण घेवून कोणाचीही भाडभीड न ठेवता धाडसाने आंतरजातीय विवाह केल्यास वर्ष - दोन वर्षातच कुटूंबीयांचा विरोध मावळून दोन जाती एकत्र येण्यास सुरुवात होते.
६. मागास जातींचे सक्षमीकरण - 
बऱ्याचदा समान वर्गाचे लोक एकत्र येण्याची प्रक्रिया असते. अत्यंत श्रीमंत, उच्चशिक्षित व्यक्ती क्वचितच अगदी दरिद्री, अशिक्षित व्यक्तीशी विवाह करू शकेल. (नाईलाजास्तव अपवाद वगळता) अनेक उच्चशिक्षित दलित पुरुषांशी ब्राह्मण स्त्रीया विवाह करू लागल्या असल्याची उदाहरणे आजकाल सापडतात. उच्चशिक्षित, मोठ्या पदांवरचे अधिकारी, श्रीमंत, दलितांमधील व सवर्णामधील दरी बरीच कमी झाल्याचे दिसून येते. त्यासाठी
१. सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण
२. झोपडपट्टी पुनर्वसन
३. आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी
इ. उपाययोजना होण्याची गरज आहे.
७. स्वप्रयत्नातून स्वविकास -
मागास जातीतील व्यक्तीनी स्वत:हून व्यसन, अंधश्रद्धा, शिवराळ व गचाळ भाषा, अस्वछ राहणीमान इ. चा त्याग करून उच्च जातींचे राहणीमानानुसार स्वत:मध्ये बदल केल्यास निश्चित पणे उचनिचता व सामाजीक दरी कमी होवू शकते. व जातीअंताचे कार्य सुकर होऊ शकते.
८. जमिनीचे समान वाटप -
एकीकडे जमीनदार मराठा - ब्राह्मण वर्ग तर दुसरीकडे भूमिहीन, अल्पभूधारक मागास वर्ग (दलित, भटकेविमुक्त, आदिवासी इ.) असल्यामुळे या दोघांमधील सामाजीक, आर्थिक दरी फ़ार मोठी आहे. ही कमी होण्यासाठी कठोरपणे जमिनीचे समान वाटप होणे आवश्यक आहे. तरच एक जात जन्मजात मालक तर दुसरी जात जन्मजात भूमिहीन मजूर ही जातीआधारीत विषमता नष्ट होईल. व समान आर्थिक स्तर असणाऱ्या जाती एकत्र येणे, त्यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य, मैत्री, प्रेम आणि विवाह होणे सुकर होवू शकेल.
९. आरक्षण -
एक काळ असा होता की भारतात सर्व सत्ताधारी व नोकरवर्ग ब्राह्मण जातीतील होता. ब्राह्मणांनी शैक्षणिक पेटंट हजारो वर्षापासून धर्माच्या नावाने स्वत:कडे ठेवल्याने बहुजन समाज अधोगतीला गेला होता. शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या आणि राजकीय आरक्षण यामुळे यास छेद बसत असून केवळ आरक्षणामुळे मागास जातींना काही ठिकाणी संधी मिळत असून त्यामध्ये स्वउद्धार करण्यास त्यास मदत होत आहे. संपूर्ण समता प्रस्थापित होईपर्यंत आरक्षण चालू ठेवणे गरजेचे असून उच्च व नीच जातींचा सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दर्जा एक सारखा होण्यास आरक्षणामुळे मदत होते. व समान दर्जा प्राप्त झाल्यावर दोन जातीतील व्यक्तींमध्ये मैत्री, प्रेम निर्माण होण्यास एक वाट निर्माण होते.
१०. नवीन कायद्यांची गरज -
१. जातीअंतर्गत विवाह बंदी -
असा कायदा करून, जातीअंतर्गत विवाहांना बेकायदेशीर ठरविले गेल्यास आणि त्यासाठी शिक्षेचे, दंडाचे प्रयोजन केल्यास आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळून जाती सुलभतेने व ताबडतोब नष्ट होतील.
२. परंपरागत स्वजातीय व्यवसाय बंदी -
चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीस आपोआपच लोक चांभार म्हणून ओळखतात, केस कापणाऱ्यास न्हावी तर मडके घडविणाऱ्यास  कुंभार ही ओळख नष्ट व्हावी यासाठी स्वजातीचा परंपरागत व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी आणून त्यास शिक्षेची तरतूद करण्यात यावी.
३. आडनावांवर बंदी -
आडनावे ही जातींची ओळख करून देण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे आडनावांवर बंदी आणून गावाचे नाव हे आडनाव म्हणून लावण्याची नवी पद्धत रुजू करावी. तसे न केल्यास त्यास शिक्षेची तरतूद असावी.
४. ब्राह्मणी पौरोहित्यावर बंदी -
पौरोहित्याचा शैक्षणिक कोर्स निर्माण करून त्यामध्ये सर्व जातीच्या लोकांना मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. यामध्ये मागास जातींना आरक्षण व स्कॉलरशिप देण्यात यावी.
अशा कोर्सचे सर्टिफ़िकेट नसेल तर पौरोहित्य करण्यास बंदी करण्यात यावी. तरी पौरोहित्य केल्यास दंड व शिक्षेची तरतूद करण्यात यावी. सदर कायदा लागू झाल्यापासून पौरोहित्याच्या कोर्सला किमान १० वर्षे एकही ब्राह्मण व्यक्तीस प्रवेश देण्यात येवू नये.
५. गलिच्छ कामास दलितांना बंदी -
कोणत्याही सरकारी कार्यालयात एकाही एस सी च्या व्यक्तीस गलिच्छ काम  देण्यात येवू नये. खाजगी क्षेत्रात कुणी दिल्यास सदर मालकावर आणि असे काम करणार्या दलितांवर गुन्हे दाखल करून शिक्षेची तरतूद करावी.

११. नवीन योजनांची गरज 
१. आंतरजातीय विवाहीत जोडप्यास घर आणि सरकारी नोकरी -
अशा स्वरुपाची योजना निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढू शकेल.
२. परंपरागत व्यवसाय त्यागून अन्य व्यवसाय स्वीकारल्यास मोफत जागा, ५ वर्षे मोफत वीज व पाणी, १०० % अनुदानीत प्रकल्प अशी योजना राबविल्यास जातीय स्तर पुसून काढण्यास मदत होवू शकेल.
३. गलिच्छ कामांचे यांत्रिकीकरण व रोबोकरण -
गलिच्छ कामे माणसांकरवी न करता यंत्रे व रोबोंकरवी करून घेण्याच्या सूचना सर्व नगर व महानगर पालिकांना देण्यात याव्यात.

जातीअंतासाठी अनुकूल बाबी 

१. भांडवलशाही कारखानदारी - 
प्रगत कारखान्यांच्या माध्यमातून उत्पादन सुरु झाल्यामुळे अनेक जातीआधारीत व्यवसाय बंद पडत आहेत. व सदर जातीच्या व्यक्तीना अन्य व्यवसायांकडे वळावे लागत आहे. प्लास्टीकचा आणि इलेक्ट्रिकल,  इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या उत्पादन व वापरामुळेही जातीअंतास पूरक अशी पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. उदा. मिक्सर आल्यामुळे वाटा, वरवंटा बनविणारे, प्लास्टिक वस्तूंमुळे बांबूच्या टोपल्या विणणारे तसेच यांत्रिकीकरणामुळे सोनार, सुतार, लोहार, कुंभार इ. च्या व्यवसायांवर परिणाम होवून त्यांना ते व्यवसाय सोडून अन्यत्र वळावे लागत आहे ही जातीअंताच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे.
२. शेतीचे भांडवलीकरण, बाजारीकरण, कंपनीकरण - 
शेतीचे आधुनिकीकरण, नफ्यावर आधारीत शेती व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, वाढता भांडवली खर्च, बाजार आधारित शेती इ. बाबींमुळे छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसून तरूण वर्ग शेतीकडे पाठ फिरवून शिक्षणाची आणि शहरातील नोकरीची वाट धरू लागला आहे. शिवाय शेतकरी कर्जबाजारी होवून मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. शेतीचे कंपनीकरण होणे ही अटळ बाब बनत असून हजारो एकर जमिनीवर यंत्राद्वारे शेती करण्याचे दिवस आता फारसे दूर नाहीत.
ज्या देशात ८०% लोक खेड्यात रहात आणि शेतीवर आधारीत होते त्यापैकी आज केवळ ५० %  लोक खेड्यात राहून शेती करत आहेत. मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर झाले असून दिवसेंदिवस स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे गावे ओसाड पडत पडून गावात केवळ वृद्ध लोक राहत असल्याचे अनेक गावात दिसून येत आहे. अनेक शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत कारण तरुण वर्ग आपल्या बायका - मुलांसहीत शहरात स्थलांतरीत झाला आहे.
जे तरुण अल्पशिक्षित आहेत तेच केवळ खेड्यात राहत असून दिवसेंदिवस त्यांमध्ये वैफल्यग्रस्तता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जातीव्यवस्था ही शेती, जमीन आणि खेडी आधारीत असल्याने खेड्यांसोबत व शेतीसोबत जातीसंस्था कोमेजत असताना दिसून येत आहे.
शहरानजीकची खेडी आज उपनगरांमध्ये समाविष्ट होत असून कालपरवापर्यंत अल्पभूधारक शेतकरी जो गरीब व मजुरी करणारया वर्गात होता तो देखील शेती विकून गुंठापती म्हणजेच करोडपती झाला असून मोठमोठे बंगले, चारचाकी गाड्या, सोने इ. घेताना दिसत असून शहरी राजकारणावर प्रभाव टाकत असतानाच खेड्यातली जमीन स्वस्तात खरेदी करून बागायती, आधुनिक व यंत्राद्वारे तिकडे बागायती शेती करू लागला आहे.
विविध ठिकाणची धरणे, खाणींचे काम, जंगलतोड व वाढते शहरीकरण यांमुळे जंगलातील माकडे व डुकरे शेतीचे नुकसान करत असून शेती पाडून ठेवण्याशिवाय अनेक गावात पर्याय उरला नाही. त्यामुळे शेती विकून पैसा करण्याकडे, मुलाला शिक्षण व नोकरीसाठी पैसा उभा करण्याकडे ग्रामिण शेतकरी वळू लागला असून अशाप्रकारे गावांचे विस्थापन हे जातीअंतास अनुकूलच आहे.
यामुळे दलित सवर्णामधील दरी कोसळून पडत आहे. परिणाम स्वरूप काही खेड्यात सवर्ण शेतकऱ्यांच्या वैफ़ल्यग्रस्ततेतून प्रगती करणाऱ्या दलितांवर हल्ले करणे, अत्याचार करण्याचे प्रमाण वाढलेले जरी दिसत असले तरी ही परिस्थिती जातीअंतास निश्चीत अनुकूल असून आर्थिक स्तर समान झाल्यास हितसंबधही एकसारखे होवू लागतात व त्याचे परिणाम स्वरूप काही काळातच दलित सवर्ण मैत्री, प्रेम व सोयरिक वाढत जाईल असे आपणास दिसून येईल.
३. शहरी स्थलांतर -
गुंठापती कसे श्रीमंत बनत आहेत हे आपण वर पाहिलेच. त्याच प्रमाणे ज्यांची शहरातील घरे पूर्वी झोपडी वजा किंवा कच्च्या स्वरुपाची होती त्यांना ती घरे बिल्डरला विकून त्या जागेवर मोठमोठ्या बिल्डींग व अपार्टमेंट बनली आहेत व बनत आहेत. बिल्डर जागामालकास पैसे, राहण्यास Flat (घर) इ. देत असून आलेल्या पैशातून गाडी, उंची फर्निचर, सोनेचांदी मध्ये  सदर व्यक्ती गुंतवणूक करत असून काहींनी स्वतंत्र व्यवसायांमध्येही पैसे गुंतविले आहेत. एकेकाळचा गरीब शहरी माणूस आजचा मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत वर्गामध्ये समाविष्ट झाला आहे. हीच बाब झोपडपट्टीतील लोकांची असून झोपडमालकाचे शासनामार्फत पुनर्वसन होवून म्हाडा इ. संस्थामार्फत त्यांना मोफत १बी एच के , १ आर के असे flat मिळाले आहेत.
खेड्यातून जी व्यक्ती शहरात येते तीस शिक्षणाच्या व रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतत. घरातील प्रत्येक सदस्याच्या हाताला काम भेटते. शहरातील रस्ते, रेल्वे, पथदिवे, दळण वळणाची साधने, मोठी बाजारपेठ, शिक्षण व रोजगाराच्या संधी, दवाखाने, शाळा, पर्यटन स्थळे, बागा इ. चाही उपभोग सदर व्यक्तीस होवून व्यक्तीची आकलन क्षमता, हुशारी, चलाखी, निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, राहणीमानात, बोलण्यात बदल, स्वत:च्या हक्काबाबत जागरुकता इ. बाबी मध्ये प्रभावी परिणाम होवून व्यक्ती निरंतर प्रगतीच्या दिशेने झेपावताना दिसतात.
मुलत: दलित वर्ग खेड्यातील भूमिहीन व दरिद्री वर्गातून आल्यामुळे गलिच्छ झोपडपट्ट्यात राहणे व गलिच्छ कामे करणे त्यास भाग पडत असले तेरी गावातील जमीनदार जातीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय गुलामीतून तो बरयाच प्रमाणात शहरात मुक्त झाला असून वर्षातून एखादेवेळी गावी गेलाच तर तो ताठ मानेनी जगत आहे. व हाती आलेल्या पैशामुळे तो लाचारी पासून आणि सावकारी कर्जापासून मुक्त झाला आहे.
तसेच वाढत्या शहरी कारणामुळे ग्रामीण भागात मजुरीचा दर हा वाढला असून एके काळी २० रुपयात १२ तास भांगलणी करायला येणाऱ्या स्त्रीया आज ६ तासाला किमान २०० रुपयाची मागणी करू लागल्या आहेत. गावात मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे जो जास्त मजुरी देईल तिकडे कामास जाण्याचा काळ वाढत असून यामुळेही शेती करणे परवडेनासे होवून मालक वर्गास शेती विकून शहरात स्थलांतरीत होणे भाग पडत आहे. या मजूर स्त्रीया पुरुष मागास जातीतील असून त्यांच्या आर्थिक वृद्धीस व सौदेबाजी करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे.
४. टी. व्ही.  
रिकाम्या वेळेत पुरुष हे पारावर जावून गप्पा मारणे, स्त्रीया एकमेकींच्या घरी जावून गप्पा मारणे असे पूर्वी करत असत. गावची राजकारणे, चालीरिती, परंपरा यावर चर्चा करून स्वत:चे वर्चस्व गावावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असे.
मात्र आज सर्व खेडूत स्त्री पुरुषांचा रिकामा वेळ टीव्ही पाहण्यात जात असून त्यांच्या डबक्यातील जगात सारे विश्व सामावून गेले आहे. बातम्या, विविध प्रकारची माहिती, मनोरंजन, सिनेमे, मालिका, खेळ इ. मधून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होत असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे, गाव विकासाच्या योजना समजून घेणे, विविध जाहिरातींच्या प्रभावातून त्यांच्या घराची रचना, घरातील वस्तू, सुखसुविधा यांमध्ये बदल झाला असून ग्रामीण भागाच्या विचारसरणीत व वर्तणुकीतही टी. व्ही. मुळे बदल झाला आहे  व हा बदल जाती अंतास पोषक आहे.
५. विभक्त कुटूंब
शिकलेल्या व कमावत्या मुली लग्न करून स्वत:चे आई वडील सोडून नवऱ्याच्या आई वडिलांची सेवा करत बसण्या पेक्षा विभक्त कुटुंबाची मागणी नेटाने लढवत आहेत. यातून विभक्त कुटूंबांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. यानुसार शहरी समाजा प्रमाणेच ग्रामीण समाजही एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंब पद्धती कडे सरकला आहे. परिणाम स्वरूप पती पत्नी आपापल्या विचारांप्रमाणे प्रगती करण्यास रिकामी झाली आहेत. त्यांचेवर आता जातीयवादी वृद्ध किंवा समाजा कडून सामुहिक दबाव राहिला नाही. यामुळेही जातीअंतास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
६. इंटरनेट व स्मार्ट फोन - 
स्मार्ट फोन तरुण मुलांमध्ये क्रांती घडवत असून माहितीचा खजिना त्यांच्या हातात आला आहे. ३ हजार रुपयांपासून मिळणारे स्मार्ट फोन आणि अतिशय स्वस्त इंटरनेट सुविधा, हातात खेळणारा पैसा व जगाशी कनेक्ट राहण्याचे पटलेले महत्व यामुळे प्रत्येक तरुणाकडे आज स्मार्ट फोन आहे. कॅमेरे, गाणी, व्हिडीओ पासून फेसबुक, व्हाटस एप पर्यंत. गुगल वर एखादी माहिती शोधण्या पासून नोकरी शोधेपर्यंत, मोबाईल बँकिंग पासून online खरेदी पर्यंत तरुणाई मजल मारत आहे. संदेशांची देवाण घेवाण व आपल्याला हव्या त्या ग्रुप मध्ये सदस्य बनणे किंवा ग्रुप स्थापन करणे अशा बाबींमुळे तरुणाई जगाशी जोडली जात असून ही पिढी निश्चित वेगळी आहे.
यामुळे योग्य ठिकाणी स्थलांतरीत होणे, नवीन मित्र जोडणे सोपे झाले आहे. यामुळे लफडी वाढली आहेत अशी काहीजनांची कुरकुर असली तरी वाढती प्रेम प्रकरणेच परंपरागत व ठरवून (जातीत बंदिस्त) केलेल्या विवाहांना सुरुंग लावतील. व हव्या त्या अनुरूप जोडीदाराशी कनेक्ट होण्यास उत्तेजन देतील. यातूनच जात नष्ट होत जाईल.
७. आरक्षण, सरकारी योजना व सवलतींचे परिणाम - 
मागासवर्गीयांना  आरक्षण, योजना व सवलतींचा लाभ होत असल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक, राजकीय स्तरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जे लोक पूर्वी भिक मागून खात होते, लंगोटीवर फिरत होते, झोपडीत रहात होते ते आज उच्चशिक्षित बनले असून सुटाबुटात राहू लागले आहेत, बंगले बांधून राहू लागले आहेत व मोटर सायकलवर फिरू लागले आहेत ते केवळ शिक्षण, आरक्षण आणि सवलतींमुळेच शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात दलित लोक शहरात स्थलांतरित झाले असून आंबेडकर जयंतीला गावी येवून जयंती दणक्यात साजरे करण्यापासून ते गावावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव टाकेपर्यंत सर्व प्रकारची चळवळ हे लोक करत आहेत.
७. अट्रोसिटी आक्ट चे परिणाम -
दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण फारसे कमी झाले नसले तरी दलित पंथरच्या काळा पेक्षा आज निश्चित फरक झाला आहे. जागृत दलित समाज आणि अट्रोसिटी अक्टचा धाक असल्यामुळे अत्याचारांच्या संख्येत निश्चित घट झाली आहे शिवाय अत्याचार सहन करण्यापेक्षा अट्रोसिटीची पोलिसात तक्रार करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
८. कम्युनिस्टांचा बदललेला दृष्टीकोन - 
एकेकाळी केवळ वर्गीय भुमिका घेवून जातीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कम्युनिस्टांवर जातीयवादी, ब्राह्मणवादी असे आरोप होत राहिले. मात्र सध्या कम्युनिस्टांनी आपली भुमिका बदलून जातीअंतामध्ये सक्रियता दर्शविण्यास सुरुवात केली आहे. तसेच दलित अत्याचारांमध्ये भुमिका निभावून आंबेडकरवादी पक्षास सहकार्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे ही जातीअंताच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे.
९. विविध  स्वजात उद्धारक संघटना 
दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओ बी सी यांच्या सामुहिक तसेच जातवार संघटना निर्माण झाल्या असून त्या त्यांच्या सदस्य जातींचा योग्यप्रकारे लढा लढताना दिसून येत आहेत. आरक्षण, शिक्षण, घरे, सरकारी नोकऱ्या, सवलती, मानवी हक्क, अत्याचार इ. बाबीत या संघटना महत्वपूर्ण भुमिका निभावत असून आपल्या मागण्यांसाठी शासनावर योग्य दबाव आणून मागण्या मान्य करवून घेत आहेत. यातूनच नवे नेतृत्व निर्माण होवून काहीजण राजकीय प्रभाव टाकण्यास यशस्वी देखील ठरत आहेत.

 जातीचे घ्रुणात्मक सद्य स्वरूप 

१. दलित अत्याचार
दिवसेंदिवस दलित अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसून ते वाढत असताना दिसून येते. खून, मारामाऱ्या, घराची /  शेतीची मोडतोड, नग्न धिंड, बलात्कार, मलमूत्र खाण्यास वा पिण्यास देणे, वस्तीवर हल्ला करणे इ. असंख्य प्रकारात हे दलित अत्याचार दिसून येतात. आज शिक्षणासाठी तरुण मुले मुली शहरांमध्ये स्थलांतरीत होतात. एकत्र शिकणे, एकत्र काम करणे यातून त्यांचे प्रेमसंबध जुळून येतात. पुढे जावून ते विवाह करण्याचे निश्चित करतात. गावी जावून आई वडिलांना जेंव्हा प्रकरण कळते तेंव्हा त्यांचा तीव्र विरोध होतो. यातून पुढे जावून जातीय द्वेष व या द्वेषातून अत्याचारांना सुरुवात होते. दलित मुलाचा खून, त्याच्या आईची नग्न धिंड काधणयापासून ते स्वत:च्या मुलीचा खून करे पर्यंत सर्व बाबी होतात. मारामारी व हल्ल्यांना ऊत येतो.
२. भंगीकाम
अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की जही भंगी उर्फ वाल्मिकी या जातीस भंगी काम म्हणजेच संडास साफ करणे, संडासच्या टाक्या साफ करणे इ. काम करावे लागते. अनेक शहरात तर खोल गटारात तोंड बुडवून अडकलेले दगड, कचरा, त्यास काढावा लागतो. उघड्यावर संडास करणाऱ्या लोकांचे संडास पत्रा व झाडू च्या साह्याने हे लोक साफ करतात. २१व्या शतकातही माणुसकीला लाजवणारे हे कार्य भंगी लोकांकडून करून घेत आहेत व पैशासाठी लाचार होवून भंगी समाजही निलाजरेपणे आजही हे काम करत आहे.
३.  कचरावेचक, भंगारवाले 
 आजही खांद्यावर पोते घेवून सकाळी ७ पासून रात्री झोपेपर्यंत अनेक दलित लोक रस्त्यावर, कचरा कुंडीवर कचरा वेचत फिरतात आणि भंगार वाल्यांना विकून पैसे कमवतात. घाणीत हात घातल्या मुळे होणारे आजार, काचा, ब्लेड कापण्याची भिती, साप, कुत्रे चावणे अशातही ऊन, थंडी, पावसामुळे हे काम करून जगावे लागते. दलित जातीने घेतलेले हे शहरी स्वरूपाच म्हणाना.
 ४. स्वच्छता कर्मचारी 
रस्त्यावरचा कचरा झाडणे, कचरा कुंडीतला कचरा उचलणे, मेलेली जनावरे उचलणे, संडास / मुताऱ्या धुणे यासारखी घाणेरडी कामे नगर व महानगर पालिकांमध्ये केवळ दलित समाज करत आहे. त्यांच्या जागेवर उच्च जातीचे कोणी भरतीच होत नाही. वास्तविक कठोर पणे या क्षेत्रात शासनाने यांत्रिकीकरण करून मनुष्यास घाण कामे करण्यातून सुटका करावी. तसेच दलितांनी स्वजातीशी चिकटलेली घाण कार्ये सोडून द्यावी. त्यापेक्षा कन्स्ट्रक्शन सारख्या क्षेत्रात काम करावे. तिकडेही रोजगार भरपूर आहे.
केवळ म्युनिसिपालिट्याच नव्हे तर गृहनिर्माण संस्था देखील वसाहतींची स्वच्छता करण्यास कर्मचारी नेमतात, तेही दलितच असतात. दलित जातींचे हे शहरी विद्रूप स्वरूप आहे.
५. सर्व क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व
 सर्व राजकीय प्रमुख पक्ष, संस्था, संघटना, युनियन्स, कंपन्या, बँका, उद्योग धंदे, सरकारी उच्च पदस्थ नोकऱ्या, देवस्थाने इ. अनेक क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व असून स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही अन्य जातींना वरच्या पदांवर फारशी मजल मारता आली नाही.
६. जमिनीचा माज 
गावातील ७० % ते ९० % जमीन जमीनदार समाजाच्या ( मराठा इ.) मालकीची असल्यामुळे भूमिहीन / अल्पभूधारक मागास जातींना त्यांचे शेतावर कामाला जाण्याशिवाय पर्याय असत नाही. त्यामुळे गावचे राजकारणावर त्यांचा प्रभाव दिसत असून दलितांवरील अत्याचारांमध्ये जमीनदारी, सरंजामी वृत्ती दिसून येते.
७. हिंदूची ब्राह्मणांप्रती मानसिक गुलामगिरी 
यादेशात ८० % समाज हा हिंदू असून तो ३ % ब्राह्मण जातीकडून पौरोहित्य करून घेतो. लग्न लावणे, अंत्यसंस्कार दशविधी करणे, सत्यनरायनाच्या पूजेपासून यज्ञ करणे पर्यंत सर्व कार्ये करणे तसेच मंदिरांमध्ये पौरोहित्य करणे इ. मार्फत लोकास स्वत:चे नादी लावून त्यांचे द्रव्य (पैसा) तर उकळला जातोच शिवाय हा वर्ग जातीय द्वेष व तेढ निर्माण करण्याचे प्रमुख कार्य करतो व समाज मनुस्मृती प्रमाणे चालविण्यासाठीचा प्रयत्न राजरोसपणे करत आहे. यांची पौरोहित्याची मक्तेदारी आजही मोडून निघालेली नाही.
८. आदिवासी भटकेविमुकतांप्रती शासन व समाज उदासीन 
आजही आदिवासी जंगलात राहून आदिम जीवन जगात आहेत. तर भटके विमुक्त संसार डोक्यावर घेवून या गावातून त्या गावात फिरत आहेत. ना पत्ता, ना कोणता अस्तित्वाचा पुरावा, नाशिक्शण, ना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ. शासन व समाजाचे या समाजाप्रती अक्षम्य दुर्लक्ष झाले असून ताबडतोबीचे उपाय योजून या समाजास मुख्य प्रवाहात आणायला हवे असे आजही कुणाला फारसे वाटत नाही.
९. जातीअंताप्रती जनतेची / शासनाची उदासिनता 
जातीअंताच्या विषयी जनता व शासन बिलकूल गंभीर नसून स्वजातीचा अभिमान व परजातीचा द्वेष असेच आजही निरंतर चालू आहे. जातीचा अंत होवून समाज एकरूप व्हावा असे कोणालाच वाटत नसून जो तो आपापल्या जातीला कुरवाळत बसला आहे. जातीच्या आधारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी देखील जातीचे राजकारण करण्यातच मश्गुल आहेत. 
१० जातीयवादी संघटना 
आरक्षणास विरोध करणे, समाजात विद्वेष पसरविणे असे कार्य करणाऱ्या असंख्य संघटना कार्यरत असून त्या वरिष्ठ जातीच्या तरुणांचे माथे भडकविण्याचे कार्य करत राहतात.
११. झोपडपट्ट्या
 गावकुसाबाहेरील वस्त्यांना शहरात गलिच्छ झोपडपट्ट्यांचे स्वरूप आले असून अत्यंत कोंदट वातावरणात खुराड्याप्रमाणे छोट्या घरात मागासवर्गीय लोकांना वास्तव्य करावे लागत आहे. उघडी वाहणारी गटारे, कचऱ्याचे ढीग, उघड्यावर संडास, अस्वच्छता, घाण, डास, मोकाट कुत्री व डुकरे यांचे सहवासात रोगट वातावरणात मानवी समाज रहात आहे. ही एक लाजिरवाणी बाब आहे.

मिडीयाचा दृष्टीकोन 

दैनिक सम्राट सारखे काही वर्तमान पत्र आणि बुद्ध चानेल वगळता अन्य प्रसारमाध्यमे ही ब्राह्मणी वर्चस्वाखाली असून जातीअंताप्रती केवळ उदासिनच नाहीत तर हिंदू धर्मातील विषमतेचे प्रचारक असेच त्यास स्वरूप आल्यासारखे वाटते. बातम्या अतिरंजीत करून स्वत:चा TRP किंवा खप वाढवून जाहिराती मिळविणे हा एक धंदा होवून बसला आहे. समाज प्रबोधनाकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष होत आहे.

जातीअंतातील अडथळे 

१. प्रेमाविरोधी संघटना
शिवसेना व तत्सम हिंदुत्ववादी संघटना या प्रेमविरांना विरिध करत असून valentine Day, friendship Day अशा दिवशी प्रेमवीर एकमेकांना गुलाबपुष्प, भेट कार्डस व अन्य भेट वस्तू देवून आपले प्रेम व्यक्त करतात. त्यावेळी हे धर्माचे ठेकेदार त्यांना मारहान करतात तसेच अशा भेटकार्डांची  विक्री करणाऱ्या दुकानाची तोडफोड करतात. व फ़ुलविक्रेत्यांचेही नुकसान करतात. हा देखील एक प्रकारचा धार्मिक दहशतवाद आहे.
प्रेमवीर काही वेळा फ़िरायला जातात. अशा वेळी पर्यटनस्तळी असे प्रेमविरोधी कार्यकर्ते त्यांना मारहान करणे, त्यांचे कडून पैसे उकळणे, त्यांचे आई वडीलांना माहिती पुरविणे असे कृत्य करून दहशत निर्माण करतात. काही वेळा पोलिस व स्थानिक गुंड देखील या दमदाटीमध्ये सामिल असल्याचे आढळून आले आहे. शिवाय वर्तमानपत्रे देखील तरुण पिढी वाचवा असा सूर आळवताना दिसत आहेत. तथापी विकृत जातीप्रथेवर भाष्य करताना मात्र पत्रकार फारसे दिसत नाहीत. सध्यातरी आंतरजातीय विवाहांना प्रेमवीरच पुढे नेऊ शकताट. कारण जातीभेदामुळे या क्षेत्रात ठरवून विवाह होणे सध्यातरी अशक्य आहे.
२. आरक्षण विरोधी संघटना 
स्वत:च्या बेरोजगारीचे कारण हे आरक्षण व भारतीय राज्यघटना आहे असा अपप्रचार करून सवर्ण तरुणांना भडकविण्याचे कार्य काही जातीयवादी संघटना आणि ब्राह्मण मंडळी करतात. यातून जाती जातींमध्ये तेढ व द्वेष वाढत जातो.

जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम … 

१. मुलांवर संस्कार 
बऱ्याचदा मुलांवर स्वत:चे आईवडीलच संस्कार करतात की आपण ब्राह्मण, मराठा किंवा फलाण्या जातीचे आहोत. आपण श्रेष्ठ आहोत. पराक्रमी, ज्ञानी इ प्रकारचे आहोत. इतर जातीचे तसे नाहीत म्हणून ते नीच किंवा कमी प्रतीचे आहेत. असे मुलांना शिकविणे सामाजीक दृष्ट्या चूक असूनही उच्च जातीतील लोक मात्र असेच प्रकार मुलांना शिकवीत असते.
२. शालेय विद्यार्थ्यांना जात विचारु नये 
शाळेतच शिक्षक मुलाना जात विचारतात. त्यांचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी. अशावेळी मुलांना आपली जात कोणती व इतरांची कोणती हे चटकन कळते. व आपल्या जातीचा स्तर देखील त्यांना समजतो. यासाठी शिक्षकांनी फक्त पालकांशीच संपर्क करावा असे सक्त आदेश शिक्षकांना द्यायला हवेत.
३. गरिब व अडाणी पालक 
बऱ्याचदा हुशार, चुणचुणीत, देखण्या मुलांना शिक्षक पुढे बसवतात. त्यांचे कौतूक करतात. त्यांना विविध प्रकारची संधी उपलब्ध करून देतात. मात्र असे विद्यार्थी बऱ्याचदा उच्च जातीतून व उच्च वर्गातून आलेले असतात. त्यांना फ़ार लक्ष देण्याची आवश्यकता नसते. कारण आई वडील सुशिक्षित, घरची परिस्थिती चांगली, घरी वर्तमानपत्रे, पुस्तके, TV, संगणक इ. ची उपलब्धता असते. मात्र गरीब मागास घरात असे काही नसते. अडाणी व गरीब पालकांनी आपल्या मुलांना केवळ शाळेत घालणे हीच मोठी बाब असते. अशावेळी ही मुले मागे बसणारी ढ समजली जाणारी, वह्या पुस्तकांचा अभाव असणारी अशी असतात. शिक्षकांनी करुणापुर्वक त्यांचेकडे जास्त लक्ष द्यायला हवे.
४. शाकाहार
कोणी काय आहार घ्यावा ही ज्याची त्याची आवड आहे. मात्र मी ब्राह्मण, सोनार, वाणी, फलाण्या जातीचा (जाणवेवाला) आहे म्हणून मी शाकाहारी व बाकीचे नीच, शुद्र जातीचे असल्यामुळे ते मांसाहारी आहेत असे मानने व शाकाहार चांगला व मांसाहार घाणेरडा असे संस्कार मुलांवर करणे व त्यातून जातीय द्वेष मुलांमध्ये रुजविणे कितपत योग्य आहे? याचा पालकांनी विचार करून मुलांवर समतेचे संस्कार करावेत.
५. विषयांची निवड
मुलांनी संस्क्रुत शिकावे की हिंदी हे सर्वस्वी मुलांवर सोडून द्यावे. तो निर्णय शिक्षकांनी त्यांचे मार्क व जात, हुशारी इ. पाहून घेवू नये. एव्हाना संस्कृत ही भाषा हिंदी भाषेला पर्याय कशी काय ठरू शकते? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यासोबत इंग्रजीला राष्ट्रभाषेचा दर्जा का नको? पाली देखील भारतातील प्राचीन भाषा आहे. जगभरातील लोक पाली शिकतात. तसेच उर्दू का नको? असे प्रश्न उभे राहताट. तात्पर्य संस्कृत भाषा शाळेत शिकविण्यात येवू नये.
६. शासनाने आदिवासी, भटकेविमुक्त, दलित वर्ग आणि दुर्गम भागाकडे लक्ष द्यावे.
प्रत्येक गावात प्राथमिक शाळा उपलब्ध असून दोन शिक्षक तिथे उपलब्ध असताट. मात्र बहुसंख्य जिल्हा परिषदेच्या ग्रामिण शाळा ह्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि खाजगी किंवा इंग्रजी शाळेच्या आकर्षणामुळे ओस पडलेल्या आहेत. आख्या शाळेचा पट ४ किंवा ५ विद्यार्थी असा असेल तर ती शाळा चालवून तरी काय उपयोग? केवळ शिक्षकांचे पगार व्हावेत म्हणून या शाळा चालू आहेत का? जर पट भरला नाही तर खाजगी शाळांचे अनुदान थांबविले जाते. मग हा नियम इथे का नको? लोकांच्या खिशातून ह्या शाळा चालतात त्या पैशाचा हा अपव्यय कशासाठी?
दुसऱ्या  बाजूला आदिवासी, भटके विमुक्त, ऊस तोड कामगार, खाण कामगार यांच्या मुलांच्या शिक्शणाचा मोठा बिकट प्रश्न आजही आ वासून उभा आहे. या शाळात विद्यार्थी संख्या जास्त असली तरी तिथे दोनच शिक्षक हा न्याय आहे का?
वास्तविक कमी विद्यार्थी असणारया शाळांचा क्लब करून जवळपासच्या गावातील मुलांना स्कूल बस सुरु करून द्यावी व मुख्य शाळेत त्यांना आणून बसवावे. आणि त्या शाळेतील शिक्षकांना मुख्य शाळेत भरती केल्यास मुलांना वर्गवार आणि विषयावर शिक्षक मिळाल्याने मुलेही चांगली शिकतील व आनंदाने बसनी घरी जातील. त्या शाळांवरचा अनाठाई खर्च ही वाचेल. तो पैसा मुख्य शाळेत लावल्यास विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उत्पन्न होतील
तसेच असे अनेक शिक्षक यातून मिळतील की ज्यांना आता काम उरले नाही त्यांना दुर्गम भाग, आदिवासी, भटकेविमुक्तांच्या शाळा, मजुरांच्या मुलाच्या शाळा इ. ठिकाणी रुजू करून विद्यार्थ्यांची सोय करून त्या मुलांची गुणवत्ता सुधारता येईल.













Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा