स्त्री दास्य

 स्त्री दास्य


गेली १० वर्षे पुरोगामी चळवळीत काम करत आलोय. अनेक स्त्रीवादी संघटनांच्या भूमिका समजून घेतल्या. संसार नवरा बायको दोघांचा. मग नवऱ्यानेही घरातील कामात बायकोला मदत करावी. मुले संभाळावीत. बायकोला मारू नये. शिव्या देवू नयेत. बायकोनेही नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून चार पैसे कमावून आणावेत. तीला घरातून मुभा असावी. तिनेही अन्याय अत्याचार सहन करू नयेत. कायद्याची मदत घ्यावी. इ. स्वरूपाची आदर्श समाजव्यवस्थेची मांडणी या चळवळी सातत्याने करत असतात.

पण हे शक्य होईल? स्त्रिया खरचं मुक्त होतील? पुरुष स्त्रीला मुक्त करेल? समानतेने वागवेल? नाही. मला नाही असे वाटत. स्त्रीवर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी आणि जबाबदारीशून्य पुरुष निसर्गाविरुध्द वागेल? का नाही? माणूस हा विवेक बुद्धी उपजत असणारा प्राणी आहे. त्याला हे शक्य आहे. मग तो असा का वागत नाही, याची कारणे शोधावी लागतील. मला कळलेली कारणे पुढील प्रमाणे.

प्रचंड भाषणबाजी केली आणि स्त्रियांनी ताठर भूमिका घेतली म्हणजे मग हे साध्य होईल? स्त्रीच्या पोटी मुले  जन्माला येतात. त्यांचे पालनपोषण, संगोपन करण्याची जबाबदारी साहजिकच तिच्यावर येते. तिच्या मुलांसाठी तीला स्वयंपाक बनवावा लागतो. त्यांची भांडी घासावी लागतात. त्यांचे कपडे धुवावे लागतात. ती मुले वापरतात तो परिसर म्हणजे घर स्वच्छ ठेवावे लागते. या सर्व दमछाककरणाऱ्या व वेळखाऊ गोष्टीतून डोक बाहेर काढून उपजीविकेसाठी कमविण्यास जाणे तीला शक्य नसते. अशा वेळी ती पुरुषापुढे अट मांडते. तुझ्यासाठी प्रजोत्पादन आणि सेवा या बदल्यात गरजेची साधने (अन्न वस्त्र निवारा) आणि संरक्षण. या तिच्या तडजोडीमध्येच तिच्या शोषणाची मुळे आहेत. तिने तिच्या गरजेपोटी स्वत:हूनच गुलामीला निमंत्रण दिलं. कारण तिचे व तिच्या मुलांच्या गरजा व संरक्षण हे तिच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत. तुलनेने पुरुषाच्या बाजूने केवळ उपभोग आहे, व उपभोग मिळावा म्हणून जबाबदारी आहे. उपभोग घेण्याचे त्याने स्वत:हून नाकारल्यास त्याला तिची व तिच्या मुलांची बिलकुल गरज नाही. अगदी सहजपणे तो तीला वाऱ्यावर सोडून देवू शकतो. म्हणून पुरुषाने तीला सोडून जावू नये म्हणून स्त्रीच्या पदरी कायमची लाचारी व गुलामी पाचवीला पुजलेली असते. तिची मुले हाच तिचा विकपॉईंट असतो. 

आपण थोडा वेळ असे मानू की पुरुषाची सेवा व प्रजोत्पादनाच्या बदल्यात गरजांची पूर्तता व संरक्षण हा तीला पुरुषाने देवून टाकलेला हक्क आहे. याची तुलना महार समाजाला गावाने दिलेल्या ५२ हक्कांशी आपणास करता येईल. मानवी गरजांची पूर्तता आणि आश्रय याच्या बदल्यात गावाचे संरक्षण व सेवा हा अस्पृश्य समाजातील लोकांनी गावाशी जो करार केला. त्यामध्येच त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, शोषण, लाचारी व गुलामीची मुळे आहेत. कारण संरक्षणाची गरज गावाला रोजच वाटत नाही. तेंव्हा गरजांची पूर्तता व आश्रय गावाला डोळ्यात खुपू लागतो. जे दलित सवर्णांच्या मर्जीत (गुलामीत) धन्यता मानतील त्यांच्या पदरी थोडे सुख. जे नाकारतील त्यांच्यावर अत्याचार ठरलेला आहे. तसेच जी स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामीत धन्यता मानेल ती देवता, पवित्र होय. मात्र जी थोडा जरी विरोध करेल ती दंडास पात्र. धर्मानेही हीच भूमिका घेतलेली आहे.

दलितांच्या या अवस्थेचे कारण ओळखूनच बाबासाहेबांनी त्यांना ५२ हक्कांवर पाणी सोडण्यास सांगितले. या माध्यमातून दलितांचे गावावरील अवलंबित्व गळून पडले. व नव्या व्यवसायांच्या स्वीकारातून गावालाच दलितांवर अवलंबून राहण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी त्यांना घेणे भाग पडले. त्यांनी स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यावी यासाठी त्यांना अत् दीप भव (स्वयंप्रकाशित व्हा) असे सांगणारा बुध्द धम्म दिला. 

स्त्रीला हेच सांगावे लागेल. तिने तिच्या हक्कांवर पाणी सोडले. पण मग तिच्या मुलांच्या संगोपनाचा यक्ष प्रश्न तिच्या पुढे उभा रहातो. त्यांचे काय? पुरुष तर कधीच त्यांची जबाबदारी घेणार नाही. जर तिने तिचे हक्क म्हणजेच गुलामी नाकारली तर.

यासाठी उपाय एकाच. अशी एक समाजव्यवस्था निर्माण करावी लागेल की स्त्री तिच्या मर्जीनुसार व समाजाच्या गरजेनुसार मुल जन्माला घालेल. पण तिच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर पडणार नाही. तर ती समाजाची असेल. जेवणासाठी भोजनालये, कपडे धुण्यासाठी लाँड्रया, घरांच्या देखभालीसाठी हाउसकीपिंग कंपन्या, मुलांसाठी शिशुगृहे, Day care center, वृद्ध स्त्री पुरुषांसाठी वृध्दाश्रमे इ. बाबी समाजाने निर्माण कराव्यात. स्त्रीने कोठेतरी नोकरी करावी. घर लॉजिंग बोर्डिंग सारखेच असेल. सारे तीला आयते मिळेल. काही करावे लागणार नाही. तर तीही तिचा वेळ कुटुंबाच्या सेवेसाठी न देता समाजाच्या सेवेसाठी देत असेल. आणि अशा प्रकारे कुटुंबाच्या सामाजीकीकरणाची प्रक्रिया घडवून आणावी लागेल.

थोडक्यात साम्यवादी कम्युनच स्त्रीला तिच्या शोषणातून बाहेर काढेल. अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही. यासाठी बुद्धाची मूल्यपरिवर्तनाची लढाई बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढाईत एकत्र करावी लागेल. व साम्यवादी समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यपध्दती (व्यवस्था), धर्म इ. आणावा लागेल.

 स्त्री दास्य भाग २

जी व्यक्ती स्वावलंबी आहे. तीच स्वतंत्र आहे व जी व्यक्ती स्वतंत्र आहे तिलाच तिचे हक्क मिळतात. जी व्यक्ती स्वावलंबी बनू इच्छिते तीला स्वत:च्या जबाबदाऱ्या स्वत:लाच घ्याव्या लागतात. आणि अपरिहार्यपणे काही कर्तव्यही बजावायला लागतात. ज्या व्यक्ती आपल्या कर्तव्यांपासून व स्वत:ची जबाबदारी घेण्यातून पळ काढतात. व आपले कर्तव्य करत नाहीत. व स्वत:च्या जबाबदाऱ्या इतरांवर सोपवितात. अशा व्यक्ती त्यांनी आपली जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या गुलाम असतात. उदा. १. माणसाने स्वत:ची जबाबदारी देवावर सोपवली तर माणूस देवाचा व देवाच्या दलालाचा गुलाम बनतो. २. माणसाने स्वत:ची जबाबदारी मालकावर सोपवली तर माणूस त्याच्या मालकाचा गुलाम बनतो. ३. दलिताने त्याची जबाबदारी सवर्णावर सोपवली तर तो सवर्णाचा गुलाम बनतो. ४. स्त्रियांनी त्यांची जबाबदारी पतीवर सोपवली तर ती त्याची गुलाम बनते.

बाबासाहेबांच्या सिद्धांताप्रमाणे व्यक्ती गुलाम बनायला जशी व्यवस्था कारणीभूत आहे. तशीच व्यक्तीची ही परावलंबी मनोवृत्तीही कारणीभूत आहे. जी व्यक्ती परावलंबी मनोवृत्तीतून बाहेर पडेल. व स्वावलंबी बनण्याची इच्छा धरेल. व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल तीच स्वावलंबनातून स्वतंत्र बनेल. व तीला तिचे हक्क प्राप्त होतील. म्हणूनच बाबासाहेब दलितांना स्वावलंबनाचे धडे देतात. ५२ हक्क, गुरे ढोरे ओढणे इ. परावलंबी प्रकारातून पोटाची खळगी भरण्यास विरोध करतात. बुद्धानेही हाच धडा मानवप्राण्याला दिला. अत् दीप भव. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. म्हणजे स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्या. इतरांवर अवलंबून राहू नका. परप्रकाशी बनू नका. म्हणजे सूर्यासारखे व्हा. चंद्रासारखे नव्हे. सूर्य स्वत:च्या मर्जीने प्रकाशतो. चंद्राला प्रकाशण्यासाठी सूर्याची मर्जी संभाळणे भाग आहे. मर्जी संभाळणे म्हणजेच गुलामी पत्करणे होय.

हाच सिद्धांत स्त्रियांनाही लागू आहे. त्यांनी स्वत:ची जबाबदारी स्वत:वर घेतली तरच त्या स्वावलंबी बनतील. त्या स्वावलंबी बनल्या तरच त्या ज्यावर अवलंबून होत्या त्याच्या गुलामीतून बाहेर पडतील. व स्वतंत्र बनतील. तरच त्यांना त्यांचे हक्क प्राप्त होतील.

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचे मग तो मुलगा असो वा मुलगी. म्हातारपणी आपल्या आईबापाला संभाळणे त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मात्र लग्न होताच मुली ज्या आईबापानी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, आपल्यावर संस्कार केले, आपल्याला शिक्षण दिले. त्या आईबापाला न सांभाळता काळ भेटलेल्या पतीच्या आईबापाची सेवा करण्यात धन्यता मानतात. म्हणूनच स्त्रिया ह्या आपल्या आईवडिलांप्रती कर्तव्यच्युती करतात. त्यांच्याशी बेईमानी व गद्दारी करतात. व भाकरीच्या तुकड्यासाठी पतीची गुलामी पत्करतात. त्यांची ही कृती अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे.

तर जगातले सर्व पुरुष माझ्या पत्नीन तिच्या आई बापाची बिलकुल सेवा, कर्तव्य करू नयेत. त्यांच्या प्रती कोणत्याही जबाबदाऱ्या सांभाळू नयेत. तर तिने माझ्या आईबापाची सेवा करावी अशी अपेक्षा धरतात. म्हणूनच असे सर्व पुरुष अत्यंत हलकट, हरामखोर आणि नालायक आहेत. 

अर्थात पण असे करण्यात त्यांचा उघड स्वार्थ आहे. माझ्या आईबापाची सेवा करण्यात मी एक माणूस मिळवला. पण कर्तव्य तर बजावली. माझ्या जबाबदाऱ्या तर पार पाडल्या. म्हणूनच मी स्वावलंबी आहे. म्हणूनच स्वतंत्र आहे. म्हणूनच मला माझे हक्क प्राप्त होतात. व ते मिळविण्याचा मला नैतिक अधिकार आहे. 

मात्र स्त्रिया कर्तव्यच्युती करतात. आपल्या जबाबदाऱ्या आपल्या भावावर सोडून मोकळे होतात. आणि शिवाय माझी कर्तव्य व जबाबदाऱ्या मी पार न पाडता माझ्या भावाच्या बायकोने पार पाडावीत अशी अपेक्षा धरून शोषण व्यवस्था बळकट करतात. व्यवस्थेचा भाग बनतात. आणि भाकरीच्या तुकड्यासाठी आपले स्वातंत्र्य, हक्क यांचा गळा स्वत:हून घोटतात.

अर्थात हा प्रश्न उभा केला की असे करायचे ठरविले तरी पती आणि ही व्यवस्था स्त्रियांना तसे करण्याची परवानगी देत नाही असे उत्तर मिळते. मात्र तुम्हाला परवानगीची गरजच का आहे? तुम्हाला परवानगी घ्यावी लागते कारण तुम्हाला पोसण्याची जबाबदारी तुम्ही पतीवर सोपवलेली आहे. म्हणूनच स्वत:च्या आईबापाला जर एखाद्या स्त्रीला पोसायचे असेल तर त्याचीही जबाबदारी त्या स्त्रीवर नव्हे तर तिच्या पतीवर येवून पडते. आणि दुसऱ्याच्या आईबापाला पोसण्याची जबाबदारी त्याने का घ्यावी? तो म्हणतो ‘ तुला आणि तुझ्या पोरांना पोसतोय तेच नशीब समज.’

यासाठी स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यावी. व स्व कमाईतून स्वत:च्या आई बापाचा सांभाळ करणे अपरिहार्य आहे. तरच त्यांना आपल्या आईबापाच्या इस्टेटीवर वारसा हक्क सांगण्याचा अधिकार राहील. नाहीतर कायदा फक्त कागदावरच राहील. ती तिचे हक्क सोडून देईल. व तिचे आईवडील आणि भाऊ बहिण तिचे हक्क हिरावून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. नैतिक जबाबदारी न स्वीकारता हक्कांची मागणी करणे म्हणजे पुन्हा स्त्रिया नालायक, हलकट, हरामखोर ठरतील. आणि काडीचेही योगदान न देता ती आई बापाची इस्टेट हडप करून भावावर व आईबापावर अन्याय करेल. तसेच ती स्वत: पतीवर अवलंबून असल्याने आई बापाच्या इस्टेटीवरही तिचा हक्क राहणार नाही. तर त्या इस्टेटीचा मालक तिचा पती बनेल. ही नव्या जमान्याची हुंडा पध्दतीच ठरेल. म्हणूनच नवतरुणीनो कंबर कसून उठा गं, स्वत:ची जबाबदारी घ्यायला शिका गं.

बुध्द हा अत् दीप भव या संदेशाद्वारे गुलामाला गुलामीची जाणीव करून देतो. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि बंड केल्याशिवाय क्रांती कशी होईल?


Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

Contact Us