व्यक्तिमत्व विकास

 


व्यक्तिमत्व विकास हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाचा भाग आहे. नुसत्या डिग्रीचा स्वविकासामध्ये फारसा उपयोग नाही. त्याला अजूनही काही विशेष प्रयत्नांची जोड लागेल. ही जोड व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणेल. लक्षात घ्या व्यक्ती नुसार हे प्रयत्न बदलतात. दुसरा जे करतो तेच करायला आपण गेलो की आपली फसगत होते. जीवन दिशाहीन आणि भरकटत जाते. त्यासाठी आपण नेमके काय करायला हवे याची अचूक जाण हवी.

स्वप्न

सर्व प्रथम आपण स्वत:साठी एक स्वप्न बघावे. अजून ५ वर्षांनी किंवा १० वर्षांनी मी कसा असेल? काय करत असेल? यामध्ये शिक्षण, पैसा, कुटुंब, नोकरी / व्यवसाय, आरोग्य, कौशल्य, आपले दिसणे इ. बारीक सारीक बाबींचा समावेश करावा. ही एक प्रकारची आपल्या स्वप्नांची यादीच असेल. आणि मग आपले यापुढचे आयुष्य मग आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी घालवावे. आपल्या स्वप्नांशी अगदी एकरूप व्हावे. त्यासाठी अविरत मेहनत घ्यावी. अगदी वेडे होवून जावे.

स्वप्नांना सत्यात उतरवायचे तर स्वत:मध्ये बदल घडवायला हवा. त्यासाठी स्वत:ची ओळख व्हायला हवी. आणि बदल करण्याची दिशा ठरायला हवी. मात्र कशी? चला तर लागुया कामाला.

ओळख स्वत:ची

स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण नेमेके कोण आहोत. आपणास नेमके काय बनायचे आहे. आणि आपणास जे बनायचे आहे ते बनण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायचे? त्याचा अनुक्रम कसा असेल? आणि यासाठी नेमका कालावधी किती लागेल याची अचूक जाण असावी लागेल. तरच अपेक्षित कालावधी मध्ये अपेक्षित परिणाम साधता येईल आणि जीवन यशस्वी बनू शकेल.

स्व चिकित्सा

आपली स्वत:ची चिकित्सा म्हणजे थोडक्यात डॉक्टर ज्या प्रमाणे रोगाचे निदान करतो त्याप्रमाणे आपणास आपल्या स्वत:चे निदान करावे लागणार आणि या कठोर आत्मपरीक्षणातून आपणास आपले चांगले गुण कोणते? दुर्गुण कोणते? विशेष गुण कोणते? कमतरता कोणत्या? आपल्या समोर नेमकी आव्हाणे कोणती आहेत याची अचूक जाण होते. आणि मग त्यानुसार ठरते आपल्या जीवन बदलाची रूपरेषा.

SWOT

जगामध्ये स्वचिकित्सेसाठी SWOT Analysiy (स्वॉट चिकित्सा) सर्व ठिकाणी वापरली जाते. आणि ती अतिशय परिणामकारक आहे. आपण आपल्या वहीतील पानाचे चार भाग किंवा रकाने करावेत. यातील प्रत्येक भागात आपणास काहीतरी लिहायचे आहे. काय लिहायचे ते पुढे स्पष्ट केले आहे.

भाग पहिला - S म्हणजे Strength अर्थात ताकद.

या भागात आपल्या स्वत:मधील क्षमता, ताकदीच्या बाजू, जमेच्या बाजूंची यादी आपणास बनवायची आहे. उदा. एखाद्याचे अक्षर वळणदार असेल किंवा शारीरिक क्षमता मजबूत असेल किंवा आवाज मधुर असेल, एखादे कौशल्य अवगत असेल. तर अशा सर्व बाबींची यादी लिहायची कि ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या आई बाबाना तुमचा अभिमान वाटत असेल.

भाग दुसरा – W म्हणजे Weakness अर्थात कमतरता

या भागात आपणास आपल्या स्वत:मधील कमतरता लिहायच्या आहेत. त्याची यादी बनवायची आहे. उदा. एखाद्या मध्ये शारीरिक दुबळेपणा असेल तर त्यांनी तो लिहावा. एखादा विषय कच्चा असेल तर तो लिहावा. एखाद्या बाबतीत आपण कमी आहोत असे जाणवत असेल तर ते सर्व इथे लिहून यादी पूर्ण करावी.

भाग तीन – O म्हणजे Opportunity अर्थात संधी

या भागात आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा आपल्या स्वप्ना पर्यंत पोहोचण्या साठी आपणास कोणकोणत्या संधी आजूबाजूला उपलब्ध आहेत त्याची यादी बनवावी. उदा. एखाद्यास इंजिनियर बनायचे असेल तर त्याने आजूबाजूचे इंजिनियरिंग कॉलेज, क्लास, ग्रंथालये, तज्ञ व्यक्ती, उपलब्ध नोकऱ्या किंवा व्यवसायाच्या संधी याची यादी इथे बनवावी.

भाग चार – T म्हणजे Threats अर्थात अडथळे

या भागात आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणीची यादी इथे बनवायची आहे. उदा. जर एखाद्या कडे जर पैशांची कमतरता असेल. किंवा एखादा विषय कच्चा असेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर अशा अडचणींची यादी आपण या रकान्यात बनवावी.

लक्षात घ्यावे व्यवस्थित वेळ देवून विचार करून ही यादी बनवावी. आपल्या व्यक्तिमत्वाच्या बारीक सारीक सर्व बाबींचा आपण यामध्ये समावेश करावा. जरूर तर आपल्या शिक्षकांची, आई वडिलांची, भाऊ बहिणींची, नातेवाईकांची, जवळच्या मित्र मैत्रिणींची मदत घ्यावी.

आता अजून एक पान घ्यावे आणि वरील प्रमाणेच पानाचे चार भाग करावे. आणि वरील भागांप्रमाणे त्या त्या भागात पुढील मजकूर लिहावा.

भाग पहिला - S म्हणजे Strength अर्थात ताकद.

यामध्ये आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्यातील क्षमता किंवा ताकद अजून वाढविण्यासाठी आपणास काय काय करायला हवे त्यांची यादी बनवावी.

भाग दुसरा – W म्हणजे Weakness अर्थात कमतरता

यामध्ये आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्यातील कमतरता कमी होण्या साठी तसेच आपल्या कमतरता या आपल्या क्षमातामध्ये परावर्तीत होण्यासाठी आपणास काय काय करावे लागेल याची यादी बनवावी.

भाग तीन – O म्हणजे Opportunity अर्थात संधी

आपणास उपलब्ध असणाऱ्या संधींचा उपयोग करून घेण्यासाठी आपणास काय काय करायला हवे त्यांची यादी आपण इथे लिहावी.

भाग चार – T म्हणजे Threts अर्थात अडथळे

आपल्या मार्गातील अडथळ्यावर आपण कशाप्रकारे मात करू? त्यासाठी काय काय करायला हवे? याची यादी या भागात करावी.

हे सर्व काम पूर्ण झाल्यावर आपल्या स्वप्नाकडे परत वळावे. आणि पुढील कार्य पूर्ण करावे.

1.     वर्षानंतर आपल्या स्वप्नातील किती भाग पण पूर्ण केलेला असेल? ते स्पष्टपणे लिहावे. बारीक सारीक तपशिलासहित सर्व बाबी लिहाव्यात.

2.     वर ठरविलेल्या ५ वर्षातील स्वप्नपूर्तीचे आपण ५ तुकडे करावेत. आणि प्रत्येक वर्षी आपण काय काय करू? हे लिहावे. उदा. पहिले वर्ष यादी, दुसरे वर्ष यादी असे करत करत संपूर्ण ५ वर्षांची ५ भागात विभागणी करावी.

3.     पहिल्या वर्षाच्या यादीचे पुन्हा ४ भागात विभागणी करावी. आणि ३ - ३ महिन्याचे तुकडे करावेत. सर्व काही क्रमवार जुळवून घ्यावे.

4.     या ३ महिन्यातील यादी पैकी मी उद्या काय करणार आहे याची यादी रोज रात्री करावी. तसेच मी काल ठरविलेल्या पैकी  आज दिवस भरात नेमके काय केले आणि काय राहिले याची नोंदणी आपल्या डायरीत करावी. आपली डायरी लिहिण्यास कधीही विसरू नये.

5.     तीन महिने पूर्ण झाल्या नंतर पुन्हा मागील ३ महिन्यांचा आढावा घ्यावा. काय काय ठरवले होते? काय काय पूर्ण झाले? काय झाले नाही? ते पाहून पुढील ३ महिन्यांची यादी पुन्हा दुरुस्त करावी. आणि वरील प्रमाणे दिनक्रम चालू ठेवावा. असे वर्ष संपे पर्यंत करत राहावे.

6.     एक वर्ष पूर्ण झाल्या नंतर पुन्हा  मागील वर्षाचा आढावा घ्यावा. मागील वर्षी ठरविलेल्या गोष्टींपैकी काय काय पूर्ण झाले? काय काय शिल्लक राहिले? आणि जे शिल्लक राहिले त्याचा समावेश पुढील वर्षीच्या यादील करून यादी अद्ययावत करावी. ३ महिन्यांचे नियोजन तसेच रोजचे नियोजन वरील प्रमाणे करत राहावे. दर वर्षी याच प्रमाणे नियोजन, आढावा, यादी बनविणे, यादी दुरुस्ती आणि अमलबजावणी करत राहावे. न थकता... जर एखादे काम नाही झाले तर नाराज व्हायचे नाही. पुन्हा नव्याने पुढील यादीत त्याचा समावेश करून प्रयत्न करतच राहायचे.

7.     अशा प्रकारे ५ वर्ष पूर्ण झाल्या नंतर पुन्हा मागील ५ वर्षांचा आढावा घ्यावा. पूर्ण झालेली कामे शिल्लक राहिलेली कामे लिहून काढावीत. पुढील ५ वर्षांच्या यादीत मागील शिल्लक कामांचा समावेश करून यादी अद्ययावत करून घ्यावी. आणि वर्ष, ३ महिने असे नियोजन करत रोज रात्री आज केलेल्या कामांचा आढावा आणि उद्या करायच्या कामांची यादी बनवावी.

शांतपणे या बाबींचे सवयीत रुपांतर करावे. आपणास कळूनही येणार नाही की थोड्याच दिवसात आपण आपल्या स्वप्नांच्या खूप जवळ पोहोचलेले असाल. आणि यशस्वी झाल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घ्याल. लक्षात घ्या अखंड प्रयत्न आणि उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर कितीही अवघड उद्दिष्ट साध्य करता येते. आणि या सर्वाला जोड हवी ती आपल्या दृढ इच्छाशक्तीची आणि प्रचंड आत्माविश्बास आणि महत्वकांक्षेची...

 

 

Comments

Popular posts from this blog

ग्रामसभा

Contact Us